Loading
कोल्हापूर, १४ऑगस्ट : कोल्हापूर विमानतळावरून दिल्लीसाठी थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ज्यामुळे कोल्हापूरकरांना राजधानीशी अधिक जवळीक साधता येणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी ही घोषणा केली आहे.
इंडिगो कंपनीचे १९० आसन क्षमतेचे विमान या मार्गावर सेवा देणार आहे. दिल्लीतून हे विमान सकाळी १०.१० वाजता उड्डाण करेल आणि दुपारी १२.५५ वाजता कोल्हापूरमध्ये उतरेल. कोल्हापूरहून परतणारे विमान दुपारी १.२५ वाजता निघून सायंकाळी ४.१५ वाजता दिल्लीत पोहोचेल.
ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे कोल्हापूरमधील व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गांवर सुद्धा विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे दोन्ही मार्गही लवकरच प्रवाशांच्या सेवेत असतील, असे खासदार महाडिक यांनी सांगितले आहे.
कोल्हापूर विमानतळाचा विस्तार आणि सुधारणा यामुळे या नव्या सेवा शक्य होत आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या हवाई दळणवळण क्षेत्रात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.