Loading
रत्नागिरी, 9 मे, : चिपळूण सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत कोल्हापूरच्या सिद्धेश पाटीलने कुंभार्ली घाटाचा राजा किताब पटकावला.
कुंभार्ली घाटाचा राजा सायकल स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली होती. पुरुष खुल्या गटात कोल्हापूरचा सिद्धेश पाटील याने १२ किलोमीटरचा कुंभार्ली घाट फक्त ३६ मिनिटे ४ सेकंदांमध्ये पार केला, तर संपूर्ण स्पर्धेच्या २९ किलोमीटर अंतरासाठी त्याला १ तास २ मिनिऐट ४१ सेकंद एवढा वेळ लागला. ही स्पर्धा जिंकत तो कुंभार्ली घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला. गेली २ वर्षे तो या स्पर्धेत सतत दुसऱ्या स्थानावर राहत होता, मात्र यंदा त्याने हा किताब आपल्या नावे करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
यंदा देश-विदेशातून मिळून एकूण ३२० सायकलपटू सहभागी झाले होते. जवळपास २० हून अधिक राष्ट्रीय ४, आंतरराष्ट्रीय, तर २५ हून अधिक राज्य स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सायकलिंगमधील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ३ खेळाडूंचादेखील यात समावेश होता. स्पर्धा ५ श्रेणींमध्ये विभागली गेली होती.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : पुरुष खुला गट : सिद्धेश पाटील (कोल्हापूर), चिन्मय केवलरामानी (गोवा), सूर्या थातू (पुणे), तेजस धांदे (नागपूर), जिम हॅन्डर्सन(इंग्लंड)