Mar, 13 2026

गजानन महाराजांचा मुखवटा चोरणारा अटकेत, मुखवटा विकत घेणारेही ताब्यात


Image Source By : Digital Satta

अमरावती, 1 ऑगस्ट, पूर्णानगर येथील गजानन महाराज मंदीराच्या दरवाज्याचे कडीकोंडा तोडुन मंदिरातील दानपेटीतील नगदी तसेच मंदीराच्या कपाटात ठेवलेला अष्टधातुचा गजानन महाराजांचा मुखवटा चोरणार्‍याला व तो विकत घेणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अजय गोवर्धन दांडगे (वय ३२ वर्ष, रा. तळणी पूर्णा, ता.चांदुरबाजार असे चोरी करणार्‍याचे तर शकिल खा रसुल खा (वय २५ वर्ष रा. सुफी नगर, वलगाव), एजाज खा बशीर खा (वय ३० वर्ष रा. कसाबपुरा, वलगाव) असे मुखवटा विकत घेणार्‍यांची नावे आहेत. मुखवटा चोरीला गेल्याची व दानपेटी फोडल्याची तक्रार आसेगाव पूर्णा पोलिस ठाण्यात आली होती. गुन्हा नोंद करून आसेगाव पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला.

तपासा दरम्यान गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून अजय गोवर्धन दांडगे याला वलगाव येथून ताब्यात घेण्यात आले. पूर्णानगर येथील गजानन महाराज मंदिर चोरी संबधाने विचारपुस केली असता त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली. विश्वासात घेवून पुन्हा विचारपुस केली असता त्याने पूर्णानगर येथील गजानन महाराज मंदिरातील गजानन महाराजांचा मुखवटा चोरल्याची कबुली देवून सदर मुखवटा वलगाव येथील शकिल खा व एजाज खा यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी वलगाव येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी कबुली दिली. मुखवटा जप्त करण्यात आला आहे. आरोपी अजय दांडगे याने येलकी पूर्णा येथील नृसिंग महाराज मंदिरात, वरुड येथील साई मंदिर व नरहरी महाराज मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३ हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण वानखडे, सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रवींद्र वर्‍हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, संजय प्रधान यांनी केली.

ad