Loading
चंद्रपूर 7 मे : ‘बिअर शॉपी’ चा परवाना मंजूर करून देण्याचे कामाकरिता एक लाख रुपयांची लाच घेण्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय जयसिंगराव पाटील यांच्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
तक्रारदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील रहिवासी त्यांचे घुगुस येथे गोदावरी बाई रेस्टॉरंट या नावाने बार आहे. त्यांना ‘बिअर शॉपी’ चे नवीन परवाना काढायचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे परवाना मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला होता. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील व दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी तक्रारदारास टाळाटाळ केली. चेतन खारोडे यांनी तक्रारदारास ‘बिअर शॉपी’ चे परवाना मंजूर करून देण्याचे कामाकरिता अधीक्षकासह स्वतःकरिता एक लाख रुपयाची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी सापळा कार्यवाही दरम्यान दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी चंद्रपुरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे कार्यलय अधीक्षक अभय बबनराव खताळ यांच्यामार्फत १ लाख रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली. तसेच दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांचे फोनवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील यांची पडताळणी केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लाच रकमेची मागणी करून स्विकारल्याने दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व अभय खताळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई येथील लाचलुचपत प्रतिबंधकविभागाच्या मंजुषा भोसले यांच्या पथकाने केली.