Loading
अमरावती 8 ऑगस्ट बडनेरा जुनीवस्ती येथे रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचे बांधकाम रखडले असून, अप्रोच रस्ते आणि अन्य कामांसाठी लागणारे भूसंपादनाची प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे रेल्वेने उड्डाणपुलाच्या भूसंपादनाच्या योग्य मोबदल्याबाबत त्वरेने निर्णय घ्यावा, यासाठी मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन कैफियत त्यांच्या पुढ्यात मांडली.दरम्यान, शेतकर्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांना निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिलेल्या निवेदनानुसार रेल्वे विभागाने बडनेरा रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी भूसंपादन करण्याचे निश्चित केले आहे. मात्र गत चार वर्षांपासून भूसंपादनाची ढकलगाडी सुरू आहे. बाजारमूल्य वा वाढीव दराने भूसंपादन करावे, अशी न्यायिक मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.रेल्वेने या उड्डाणपुलाचे बांधकाम अर्धवट केले आहे. त्यामुळे या पुलाच्या खालील भागातून विद्यार्थी, ग्रामस्थ, व्यावसायिक, कामगारांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. याच मार्गावरून १५ ते २० ग्राम जुळले आहे. नागपूर महामार्ग रिंगरोड, एमआयडीसी, अभियांत्रिकी महाविद्यालय, रायसोनी विद्यापीठ, रेल्वे स्थानक, वॉलमार्ट असून प्रचंड वाहतूक याच पुलाखालून दरदिवशी होत आहे. बांधकाम रखडल्यामुळे भूसंपादन केव्हा होणार याबाबत प्रकल्पग्रस्त शेतकरी चिंतित आहेत. न्यायिक व कायदेशीरपणे भूसंपादनाचा मोबदला मिळावा, अशी माफक अपेक्षा निवेदनातून केली आहे. भूसंपादनाची रितसर प्रक्रिया होत नाही, तेथपर्यंत संबंधित रेल्वे विभागाने किंवा कंत्राटदाराने मालकीच्या जमिनीवर काम करू नये किंवा यांना तशी परवानगी भू-संपादन कार्यालयाने देऊ नये, अशी मागणी मुन्ना उर्फ देवेंद्र जोशी, अब्दुल सलिम, आसिफ हुसेन, अब्दुल नगमान, सय्यद वखार, राजेश उसरे, पवन उसरे, विशा, डाबरे, मुकेश उसरे, कमलकिशोर कासट, रोसम्मा वेटपल्ला, कमलादेवी मालाणी, सुरेश जोशी, अनिल छतवानी, आभा हेडा आदी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.