Mar, 13 2026

मुसळधार पावसामुळे पुणे स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात साचले पाणी


Image Source By : Digital Satta

पुणे, 19 ऑगस्ट । पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातच आता तळे साचू लागले आहे. या गु़डघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना स्थानकाच्या आतमध्ये पोहोचावे लागत आहे. एवढ्यावरच प्रवाशांचे दिव्य संपत नसून, गळके फलाट प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार आहेत. या सगळ्यातून कसरत करीत जीवावर उदार होत रेल्वे गाडीत चढण्याचे आव्हान सध्या प्रवाशांना पेलावे लागत आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या स्थानकाची अवस्था अतिशय खराब होते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आपला तोल सांभाळायचा की हातातील बॅगा सांभाळायच्या असा प्रश्न प्रवाशांसमोर उभा राहत आहे. या गुडघाभर पाण्यातून वाट काढताना प्रवाशांची तारांबळ उडत आहे. याचबरोबर अनेक फलाटांवर पावसाचे पाणी गळत आहे. यामुळे हे फलाट निसरडे झाले आहेत. रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवासी मोठ्या संख्येने गाडी पकडण्यासाठी धावतात. या निसरड्या फलाटांमुळे मोठा अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ad