Loading
पुणे, 6 ऑगस्ट, गेल्या दोन, तीन आठवडयांपासून पुणे शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मात्र या जोरदार पवसामुळे मुळा – मुठा नदी काठाच्या अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक गोरगरीब कुटूंबियांचे संसार उघड्यावर पडले असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचारकरता पुरामुळे बाधीत झालेल्या अंदाजे दहा हजार कुटूंबाना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी; तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येत्या गुरूवार दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कचेरी ते महानगरपालिका दरम्यान ‘पुरगस्तांचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शरहाराध्यक्ष संजय सोनवणे यांनी या विषयी माहिती दिली. यावेळी प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, शाम सदाफुले आदी यावेळी उपस्थित होते.
संजय सोनवणे म्हणाले, गेल्या अनेक आठवड्यांपासून पुणे शहरात सरासरी पेक्षा जास्त पासून होत आहे. यामुळे पुणे जिल्हयातील सर्व धरणे ९० टक्के भरली आहेत. तसेच खडकवासला धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठी रहाणाऱ्या नागरी वस्त्यांत पाणी शिरत आहे. पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावी शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधीत झाली आहे. मात्र, शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. आगामी काळात देखील या नदी काठाच्या जनतेच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने येत्या येत्या ८ ऑगस्टला सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कचेरी ते महानगरपालिका दरम्यान ‘पुरगस्तांचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.