Mar, 13 2026

वाशिमच्या मौजे बोरी बु.येथे सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती


Image Source By : Digital Satta

वाशिम, 1 जून (हिं.स.) : तालुका कृषी अधिकारी वाशिम यांच्यामार्फत मौजे बोरी बु.येथे प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करून गटाची निर्मिती करण्यात आली.

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत मौजे बोरी बु. येथे सेंद्रिय शेती बाबत जनजागृती करण्याकरिता तथा गटाची निवड करण्याकरिता शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गजानन रामकिसन मापारी व पोलीस पाटील विश्वनाथ मापारी होते.

यावेळी कृषी सहाय्यक एम.डी. सोळंके यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची माहिती देताना सांगितले की, भारतीय कृषी क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आहे आणि जमिनीचा पोत खालावलेला आहे. त्यामुळे सुपीक जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होत चालल्या आहेत.सतत होणाऱ्या रासायनिक कीटकनाशकांमुळे आणि खतांमुळे जमीन व पाणी दुषीत होत आहे. यासाठी एकुणच शाश्वत कृषि उत्पादनासाठी नैसर्गिक म्हणजेच सेंद्रिय शेती हा एक उत्कृष्टपर्याय आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवुन जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कृषी सहाय्यक एम.डी. सोळंके यांनी दिली.

ad