Mar, 13 2026

गुजरातमध्ये आतापर्यंत पुरामुळे 28 जणांचा मृत्यू


Image Source By : Hindustan Samachar

राज्यातील 18 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

गांधीनगर, 29 ऑगस्ट : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे गेल्या 3 दिवसांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागातून जवळपास 18 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला असून केंद्राकडून राज्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पुरामळे मोरबी, वडोदरा, भरूच, जामनगर, अरावली, पंचमहाल, द्वारका आणि डांग जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला, तर आणंदमध्ये 6, अहमदाबादमध्ये 4, गांधीनगर, खेडा, महिसागर, दाहोद आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला. मोरबी जिल्ह्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर-ट्रॉली वाहून गेली, यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागाने गुजरातमधील 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट आणि २२ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आयएडीने कच्छ, द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, जुनागढ, राजकोट, बोताड, गिर सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांसह कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उत्तर, मध्य आणि दक्षिण गुजरातसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वडोदरा येथे पाऊस थांबला असला तरी, विश्वामित्री नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडून वस्त्यांमध्ये प्रवेश केल्याने अनेक भागात पुराचे पाणी साचले आहे.

ad