Loading
शिवकाशी, 09 मे : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात आज, गुरुवारी फटाके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झालेत. मृतकांमध्ये 5 महिलांचाही समावेश आहे. शिवकाशीजवळील सेंगमलापट्टी गावातील श्री सुदर्शन फटाके येथे हा अपघात झाला.
सारवणन यांच्या मालकीच्या युनिटमध्ये 40 पेक्षा जास्त कार्यरत शेड आहेत. कामगार शेडमध्ये गुरुवारी दुपारी फॅन्सीचे फटाके बनवत असताना घर्षण होऊन स्फोट झाला. आग लगतच्या शेडमध्ये पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. जखमींना शिवकाशी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एका निवेदनात सांगितले की, स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाल्याने दु:ख झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत आणि जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री केली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. शिवकाशी हे भारतातील फटाके उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. येथून फटाके, सेफ्टी मॅच आणि स्टेशनरी वस्तू तयार करून संपूर्ण देशात पाठवल्या जातात.