Apr, 19 2026

Report: General Brasstacks- The Sundarji Story: द्रष्टा सेनाप्रमुख


Image Source By : Digital Satta

General Brasstacks- The Sundarji Story: द्रष्टा सेनाप्रमुख - general brasstacks- the sundarji story book special explained - Maharashtra Times


General Brasstacks The Sundarji Story Book Special Explained

General Brasstacks- The Sundarji Story: द्रष्टा सेनाप्रमुख


महत्वाचे मुद्दे

  • General Brasstacks- ...
  • ...

General Brasstacks- The Sundarji Story: भारताच्या शस्त्रसज्जतेविषयी अमेरिकन ॲटॅचीचे उद्गार होते, युद्धच झाले तर पाकिस्तान एखादा महिनाच तग धरू शकेल. ही जनरल सुंदरजींच्या कामगिरीला दिलेली पावतीच.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय सैन्याने शत्रूराष्ट्रांच्या अनेक आक्रमणांचा सामना करत सीमांचे रक्षण केले. अपवाद फक्त १९६२च्या भारत-चीन युद्धाचा. पुढे १९६७मध्ये भारतीय आणि चिनी सैन्याची सिक्कीम-तिबेट सीमेवरील नथुला आणि चोला पास येथे लढाई झाली. लढाईत मेजर जनरल सगतसिंहाच्या नेतृत्वाखाली सैन्याने चिनी आक्रमकांना पिटाळून लावले आणि १९६२च्या पराभवाची भरपाई केली. १९८६मध्ये परत एकदा चिनी सैन्याशी लढण्याचा प्रसंग आला. झाले असे की, केंद्र सरकारने केंद्रशासित अरुणाचल प्रदेश ाला देशाचे २४ वे स्वतंत्र राज्य जाहीर केले. या घोषणेमुळे चीनचे अरुणाचल प्रदेश गिळंकृत करण्याचे स्वप्न भंग पावले.

चीनने अरुणाचल प्रदेश ताब्यात घ्यायचे ठरवले. मात्र चिनी सैन्याचा सामना या वेळी कार्यक्षम, संगणकतज्ज्ञ लष्करप्रमुखांशी होता. अरुणाचल प्रदेशात त्यावेळी कार्यरत असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी त्यांच्या तोफा, शस्त्रसामुग्री उंचावर वाहून नेण्यासाठी खेचरांची मागणी केली. मागणी नाकारत सेनाप्रमुखांनी इंडियन एअरफोर्सची मदत घेत हेलिकॉप्टर्समधून एक ब्रिगेडच भारत-चीन सीमेवरील झोमिथांग येथे उतरवली. सैन्याने तोफांचा वापर करत चिनी सैन्याला पिटाळून लावले. हिमालयातील अतिशय दुर्गम आणि उंचीवर असलेल्या पोस्टवर हेलिकॉप्टरने सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्रे नेण्याचा हा भारतीय सैन्य दलातील पहिला प्रयोग. हा प्रयोग करणाऱ्या चीफ ऑफ आर्मी स्टाफचे नाव होते जनरल के. सुंदरजी (कृष्णस्वामी सुंदरजी). या जनरल के सुंदरजी यांचे चरित्र ‘जनरल ब्रासटॅक्स : द सुंदरजी स्टोरी’ या पुस्तकात सुप्रसिद्ध लेखक प्रबल दासगुप्तांनी कथन केले आहे.

या चरित्राची विभागणी ११ प्रकरणांत केली आहे. पहिल्या तीन प्रकरणांत बालपण, शिक्षण त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश सैन्यात अधिकारी म्हणून नेमणूक, पुढे महार रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्ती, फाळणीनंतर भारतात परत, असा प्रवास उलगडून दाखवला आहे. त्यांच्या सुंदर नावापुढे त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘जी’ हा प्रत्यय कसा लागला याची लोभस कथा या प्रकरणात आहे. कांगोमध्ये इंडियन पीस कीपिंग फोर्समध्ये नियुक्ती या प्रकरणात वाचकांच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य उमटवणारे प्रसंगही आहेत. तसेच अगदी थोडक्या शब्दांत काहींची शब्दचित्रेदेखील आहेत. त्यामधील एक आहे, महार रेजिमेंटच्या परब या अधिकाऱ्याचे.

या पुढील प्रकरणात ८०च्या दशकात देशात कांही अतिसंवेदनशील घटना घडल्या, ज्यामुळे देशातले राजकीय सामाजिक जीवन ढवळून निघाले होते. अशा सर्व घटनांशी लष्करप्रमुख म्हणून जनरल सुंदरजींचा संबंध आला होता. अगदी पहिली घटना म्हणजे ऑपरेश ब्लू स्टार. सुवर्णमंदिरातून भिंद्रनवाले आणि त्याच्या अनुयायांना हुसकावून लावण्यासाठी लष्कराला बोलावण्याचा निर्णय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ची योजना आखली, उपलष्कर प्रमुख सुंदरजींनी. खलिस्तानी अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी रणगाडे आणले गेले. या मोहिमेचा शेवट दुर्दैवाने पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नंतर जनरल वैद्य यांच्या हत्येने झाला. हे वाचताना अतिशय क्लेश होतात.

जनरल ब्रास टॅक्स या प्रकरणात संरक्षण सिद्धतेची क्षमता अजमावून बघण्यासाठी सैन्य, शस्त्रे, रणगाडे अगदी जलद गतीने देशाच्या एका टोकापासून पाकिस्तानच्या सीमांवर नेण्यासाठी केलेल्या मोहिमेची माहिती मिळते. ही कल्पना सर्वस्वी जनरल सुंदरजींची. सुंदरजींनी पाकिस्तानच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात सैन्य जमा केले होते.

श्रीलंका आणि एलटीटीईच्या संघर्षामध्ये भारताने शांतिसेना पाठवली. श्रीलंकेने पाहुण्याच्या हाताने एलटीटीईचा बीमोड केला. जनरल सुंदरजींच्या यातील सहभागाबद्दल अनेक प्रश्नचिन्हे या प्रकरणात मान्यवरांनी उपस्थित केली आहेत. भारतीय सैन्यदलाला या मोहिमेत आपले अनेक सैनिक गमवावे लागले. पंतप्रधान राजीव गांधींना या निर्णयामुळे जीव गमवावा लागला. सुंदरजींच्या कारकिर्दीला लागलेले हे गालबोट. अर्थात या प्रकरणात अनेक मतमतांतरे मांडलेली आहेत. भारताचे अण्वस्त्र धोरण ठरवण्यात सुंदरजींचा महत्त्वाचा वाटा होता. शेवटच्या प्रकरणात त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा वेध घेतला आहे. चरित्राच्या शेवटी सुंदरजींचे बंधू श्रीधर जे पुढे रिअर ॲडमिरल झाले, त्याचा नाममात्र उल्लेख चरित्रात आहे.

प्रबल दासगुप्ता यांनी सुंदरजींच्या कारकिर्दीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. पुस्तक वाचनीय आहे. याचा मराठी अनुवाद व्हायला हवा.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Code of Journalistic Ethics: नीतिमत्ता, नीतिमूल्ये आणि नैतिकता

Flesh By David Szalay: उपभोगकेंद्रित समाजाचे चित्रण

The Battle Of Rezang La: अविचल रणधैर्याची रोमांचक कहाणी

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad